बेळगाव लाईव्ह : अलीकडच्या काळात पालकांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. याकडे लक्ष दिल्यास पालकांनी मुलांना भावी जीवनाच्या वाटा चोखाळण्याचे स्वातंत्र्य द्यावे.भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांबरोबर पालकांचेही असल्याचे प्रतिपादन,माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.
कॅम्प येथील बी.के. मॉडल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात आज खासदार जगदीश शेट्टर आणि डॉक्टर गुरुराज करजगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खासदार शेट्टर म्हणाले,बी के मॉडल हायस्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक ज्ञान देण्याचे काम केले आहे. संस्कृती परंपरा टिकविण्याचे काम या शाळेने केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे काम या शाळेने केले आहे.
आत्मविश्वासामुळेच या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भावी जीवनात भरीव प्रगती केली आहे. शिक्षकांबरोबरच पालकांनीही मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करावा. आपल्या मुलांवर मते लादण्याचा प्रयत्न करू नये. शिक्षक आणि पालकांनी मुलांवर आत्मविश्वासाबरोबरच राष्ट्राभिमान जागृत करण्याचे कार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉक्टर गुरुराज करजगी म्हणाले, आजची पिढी मोबाईल लॅपटॉप सारख्या.निर्जीव वस्तूत गुंतली आहे. यातून नातेसंबंधात दुरावा वाढला आहे. मुलांमधील मानसिकता बदलत चालली आहे. पुस्तकी ज्ञानाचा तमाशा झाला आहे. शिक्षक नोकरी या भावनेतून काम करत आहेत.
यातून शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. कौटुंबिक वातावरण बदलत आहे. याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षकांनी आपल्यासमोरील विद्यार्थी आपली मुले समजून शिकवण्याचा प्रयत्न करावा. पालकांनीही शिक्षकांबरोबर सातत्याने सुसंवाद राखावा आवाहन करजगी यांनी केले.
या कार्यक्रमात श्रीनिवास शिवणगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अखेरीस बीके मॉडल हायस्कूल श्रीधर कुलकर्णी उषाताई गुप्ते हायस्कूल तसेच प्रभाकर शहापूरकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.




