belgaum

शिक्षणातून राष्ट्रघडणीकडे : बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवात विचारमंथन

0
414
 belgaum

बेळगाव लाईव्ह :स्पर्धा, तंत्रज्ञान आणि झपाट्याने बदलणाऱ्या जगात विद्यार्थ्यांना केवळ गुणांपुरते मर्यादित न ठेवता विचारशील, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य बी.के. मॉडेल हायस्कूलने गेल्या शंभर वर्षांत सातत्याने केले आहे. या दीर्घ शैक्षणिक वाटचालीमुळेच शाळेचे विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ तथा कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांनी केले.


बी.के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सेंद्रिय शेतीतज्ज्ञ के. ई. एन. राघवन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


डॉ. चंदावरकर म्हणाल्या की, शिक्षण ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती प्रक्रिया नसून योग्य वातावरण, प्रेरक शिक्षक आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची सांगड घातली तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. बी.के. मॉडेल हायस्कूलमध्ये हे वातावरण सातत्याने जपले गेले आहे. इच्छाशक्ती, ज्ञान आणि उत्साह या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षणपद्धती ही या संस्थेची खरी ओळख ठरली आहे.

 belgaum


नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेला दिलेले महत्त्व या संस्थेने आधीपासूनच प्रत्यक्षात उतरवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. इंग्रजीसोबतच कन्नड व मराठी भाषांना समान महत्त्व देत विद्यार्थ्यांना भाषिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे कार्य शाळेत सुरू आहे, हे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.


शाळेच्या शतकपूर्तीमागे शिक्षकांचा त्याग, संचालकांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि संस्थेची मूल्यनिष्ठ परंपरा असल्याचे सांगत डॉ. चंदावरकर यांनी सर्व घटकांचे कौतुक केले. सेंद्रिय शेतीतज्ज्ञ राघवन यांनीही यावेळी शिक्षण व समाज यांचा समन्वय साधणाऱ्या विचारांवर भर दिला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला शुक्लांबर पत्तार यांनी स्वागतगीत सादर केले. श्रीनिवास शिवणगी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी आभारप्रदर्शन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.