Friday, December 5, 2025

/

शेतकऱ्यांसाठी भाजपचा 9 रोजी सुवर्णसौधला घेराव –

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून सरकारला जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे शेतकरी बांधवांच्या सहकार्याने येत्या मंगळवार दि. 9 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बेळगाव सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजप नेते माजी आमदार संजय पाटील यांनी दिली.

बेळगाव शहरात आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी आमदार पाटील म्हणाले की, येत्या 8 डिसेंबर पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तथापि दरवर्षी सरकारकडून बेळगावमध्ये आयोजित केले जाणारे हे हिवाळी अधिवेशन म्हणजे मौजमजेसाठी गोव्याची सहल अशी लोकांची भावना होऊ लागली आहे.

तेंव्हा उत्तर कर्नाटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशी भावना ठेवून सरकारने काम करावे आणि या प्रदेशाचा सर्वांगीण विकास साधावा, अशी मागणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते सरकार समोर ठेवत आहोत. उत्तर कर्नाटकातील शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 belgaum

त्याकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केले जात आहे त्यावरून सरकार शेतकऱ्यांना मानसन्मान देत नसल्याचे, त्यांची काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जनता, शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टींऐवजी मुख्यमंत्री पद, मेजवान्या या संदर्भातील बातम्या टीव्हीवर सतत झळकत असल्यामुळे चिकन, कोळी-नाटी वगैरे गोष्टी करण्यासाठीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार काम करत आहे का? असा प्रश्न आमच्या मनात निर्माण होत आहे.

यासाठीच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात येत्या मंगळवारी 9 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे शेतकरी संघटनांच्या सहकार्याने भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांकडून सुवर्ण विधानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाजवळील मालिनी सिटी येथून मंगळवारी सकाळी 10 वाजता भव्य मोर्चाने जाऊन राज्याध्यक्ष विजयेंद्र आणि जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदारांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण विधानसौधला घेराव घातला जाईल.

तरी बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन तो यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेस भाजप नेते माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, एम. बी. जिरली, विश्वनाथ पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.