बेळगाव लाईव्ह : भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयात लवकरच सरपटणारे प्राणी (सर्प) आणि मगरींसाठी आवार सुरू करण्यात येईल, अशी माहिती वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिली.
प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन मगर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीच्या आवाराच्या कामाची प्रगती तपासताना त्यांनी सांगितले की, ५० लाख रुपये खर्चून मगरींचे आवार आणि ४०.८ लाख रुपये खर्चून सरपटणाऱ्या प्राण्यांचे आवार बांधले जात आहे.
या आवारात लवकरच २ मगरी आणि अजगर, किंग कोब्रा, मण्यार यासह १२ साप सोडण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव आणि प्राणीसंग्रहालयाबद्दल माहिती देण्यासाठी एक छोटे चित्रपटगृह बांधण्यात आले असून, त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्राणीसंग्रहालयाच्या आवारात पर्यटकांच्या वाहन पार्किंगसाठी मोठी जागा, वीरांगना कित्तूर राणी चन्नम्मा यांचा पुतळा यासह विविध कामे एकूण ५.८५ कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
पक्षी विभागात पारदर्शक काच लावण्यात आली असून, त्यामुळे पक्ष्यांचे निरीक्षण करणे आणि त्यांचे फोटो काढणे पर्यटकांना सोयीचे झाले आहे. या सर्व सुविधांमुळे प्राणीसंग्रहालय आगामी काळात अधिक पर्यटकांना आकर्षित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


