बेळगाव लाईव्ह :काँग्रेस संसदीय पक्षाच्या बेळगाव येथे झालेल्या बैठकीत विधानसभा अधिवेशन पारंपरिक डिसेंबरऐवजी जूनमध्ये घेण्याची शक्यता गंभीरपणे चर्चिला गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सुवर्णसौध येथील अनेक वर्षांची हिवाळी अधिवेशनाची परंपरा चालू राहणार का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अधिवेशन वेळापत्रकाचा आढावा घेतला. परंपरेनुसार अर्थसंकल्पानंतरचे पावसाळी अधिवेशन साधारणपणे बंगळुरूमध्ये भरवले जाते. मात्र या वेळी काही सदस्यांनी ते बेळगावात हलवण्याचा प्रस्ताव मांडल्याचे सूचित झाले आहे.
हिवाळी अधिवेशनावेळी बेळगावात वारंवार उद्भवणारे आंदोलन, सुरक्षा ताणतणाव आणि प्रशासकीय अडचणी या मुद्द्यांवर बैठकीत चिंता व्यक्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, बैठकीत आमदारांना शासकीय हमी योजना प्रभावीपणे मांडण्याचे आणि विरोधकांना दमदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले. अधिवेशन वेळापत्रकातील बदलाचा प्रस्ताव अनपेक्षितपणे समोर आल्याने आगामी काळात यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


