बेळगाव लाईव्ह :मद्यपी वाहनचालकांविरुद्ध होणार कठोर कारवाई…पोलीस आयुक्त
‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना खबरदारी घ्या अन्यथा होईल कारवाई..
: रस्ते सुरक्षा समिती आणि पोलीस मुख्यालयाने दिलेल्या आदेशानुसार बेळगाव शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दिनांक २२ डिसेंबर ते २९ डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीत शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १३८ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून ही कारवाई केली असून, दोषी आढळलेल्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
मद्यपी चालकांविरुद्धची ही धडक मोहीम आगामी काळातही अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.




