दामदुप्पटीच्या आमिषाने खानापुरात ३१ लाखांची फसवणूक

0
697
Khanapur news
 belgaum

.


बेळगाव लाईव्ह : सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने नागरिकांना गंडवण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना खानापूर तालुक्यात उघडकीस आली असून, हुलीकोत्तल (ता. खानापूर) येथील एका रहिवाशाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३१ लाख २० हजार रुपयांना गंडवले आहे.

याप्रकरणी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आली असून, चंद्रगौडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी फेसबुकवर पेटीएम कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधीची एक जाहिरात तक्रारदारांच्या निदर्शनास आली होती. ‘पेटीएम मनीमध्ये गुंतवणूक करा, दामदुप्पट परतावा मिळवा’ असे आकर्षक आश्वासन या जाहिरातीत देण्यात आले होते. जाहिरातीखालील लिंकवर क्लिक करताच संबंधित व्यक्तीचा मेसेज थेट एका व्हॉट्सअॅप ग्रुपकडे वळवण्यात आला.

 belgaum

यानंतर ‘यशस्विनी जिंदाल’ या नावाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून चॅटिंग सुरू झाली. सायबर गुन्हेगारांनी विश्वास संपादन करत झटपट नफा मिळण्याचे आमिष दाखवले. पुढे त्यांनी तक्रारदारांच्या नावाने एक ऑनलाईन खाते उघडून, त्या खात्यात नफा जमा झाल्याचे बनावट चित्र दाखवले. ऑनलाईन खात्यात रक्कम दिसत असल्याने तक्रारदारांचा त्यांच्यावर विश्वास बसला.

या विश्वासाच्या आधारे टप्प्याटप्याने विविध खात्यांमध्ये पैसे जमा करून घेण्यात आले. गुंतवणुकीच्या नावाखाली एकूण ३१ लाख २० हजार रुपये घेतल्यानंतर अचानक सायबर गुन्हेगारांनी संपर्क तोडला. नफा तर मिळालाच नाही, उलट गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळाली नाही.

बेळगाव शहर व जिल्ह्यात अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा’, ‘झटपट श्रीमंत व्हा’ अशा आमिषांद्वारे नागरिकांना लाखो रुपयांना गंडवले जात आहे. यासोबतच डिजिटल अरेस्टसारख्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

जिल्हा व शहर सायबर क्राईम विभागाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या सातत्याने वाढत असून, पोलिस प्रशासनाकडून वारंवार जनजागृती करूनही फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही, अशी चिंताजनक स्थिती आहे.

नागरिकांनी सोशल मीडियावरील अशा आकर्षक जाहिरातींना बळी न पडता, कोणतीही ऑनलाईन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. संशयास्पद कॉल, लिंक किंवा मेसेज आल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.