बेळगाव लाईव्ह:बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय -अत्याचार व हिंदू हत्याकांडाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज बेळगाव शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी बांगलादेश सरकारच्या प्रतिकृतीचे दहन करण्याबरोबरच रास्ता रोको करून भारत सरकारने तात्काळ बांगलादेशावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार वाढत असल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी संयुक्तरीत्या आज शुक्रवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे मोठे आंदोलन छेडले. यावेळी कार्यकर्त्यांनी भारत सरकारकडून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि हिंदूंची सुरक्षा व्हावी अशा कूटनीतिक हस्तक्षेपाची मागणी केली. हातात संघटनेचा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद मुर्दाबाद बांगलादेश मुर्दाबाद अशा धिक्काराच्या, तसेच हिंदू धर्म की जय, जय श्रीराम जय जय श्रीराम, देश के सन्मान में बजरंग दल मैदान मे, धर्म के सन्मान में बजरंग दल मैदान मे वगैरे घोषणा देऊन चन्नम्मा चौक दणाणून सोडला होता.
याप्रसंगी मानवी साखळी करून चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. त्याचप्रमाणे बांगलादेश सरकारच्या प्रतिकृतीचे आणि पोस्टरचे भर चौकात दहन करून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सदर आंदोलनामुळे राणी कित्तूर चन्नम्मा चौकातील वाहतूक कांही काळ ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलन स्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कारंजी मठाचे प. पू. श्री गुरुसिद्ध महास्वामीजी सांगितले की, आपल्या देशात शेजारील लहान राष्ट्र असणारे बांगलादेश जे पूर्वी पाकिस्तानचा भाग होते. बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वी तेथील बंगाली मुस्लिमांवर प्रचंड अन्याय अत्याचार झाले होते. त्यावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सेनेला बांगलादेशात धाडून तेथील जनतेचे रक्षण करण्याबरोबरच त्या देशाच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केले.
आज देखील भारत सरकार बांगलादेशला अन्न, वस्त्र, पाणी वगैरे आवश्यक गोष्टींचा पुरवठा करत असते. भारताचे इतके उपकार असून देखील गेल्या वर्षभरापासून बांगलादेशी नागरिक तेथील आमच्या हिंदू बंधू-भगिनींवर अन्याय अत्याचार करत आहेत. हिंदू मंदिरांची तोडफोड केली जात आहे. तेंव्हा इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे धैर्य दाखवून भारत सरकारने कठोर पाऊल उचलावे. त्यासाठी तात्काळ बांगलादेशावर आक्रमण करावे आणि तेथील हिंदू बंधू-भगिनींचे, तसेच हिंदू देव-देवतांचे संरक्षण करावे, अशी भारत सरकारला माझी विनंती आहे असे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी म्हणाले.




