अथणी लाईव्ह :पतीकडील सततच्या जाचाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नी व तिच्या कुटुंबीयांवर पतीने पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील तेलसंग गावात घडली असून ही बाब उशिरा समोर आली आहे.
ही घटना दि. १० डिसेंबर रोजी घडली. भीमा भोसले (रा. येलिहडळगी, ता. अथणी) असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नी राणी भोसले पतीचा त्रास सहन न झाल्याने माहेरी राहत होती. याच रागातून “माझ्या विरोधात जाऊन तुम्ही माझ्या पत्नीला माहेरी कसे नेले?” असे म्हणत आरोपी भीमाने पत्नीच्या माहेरी जाऊन घरातील सहा जणांवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात संजू साळुंखे, शंकर साळुंखे, कृष्णा साळुंखे, अंकुश पडतारे, मनोहर पडतारे आणि पत्नी राणी भोसले हे गंभीर भाजले गेले आहेत. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी ऐगल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


