बेळगाव लाईव्ह: बेळगावमध्ये स्थापन करण्यात आलेल्या कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगासाठी कायमस्वरूपी न्यायाधीशाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनने छेडलेले धरणे आंदोलन आज चौथ्या दिवशी सुरूच होते. आंदोलन करणाऱ्या वकिलांनी आज बुधवारी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री एच. के. मुनियाप्पा यांची भेट घेऊन आपली मागणी त्यांच्यासमोर मांडली.
बेळगाव बार असोसिएशनतर्फे उपरोक्त मागणीसाठी अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गेल्या तीन दिवसापासून धरणे सत्याग्रह करण्यात येत आहे. सदर आंदोलनात असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. शीतल रामशेट्टी, सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसह सदस्य वकीलवर्ग मोठ्या संख्येने सहभाग असतो. आंदोलन करणाऱ्या बार सोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या माध्यमातून अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री एच. के. मुनियाप्पा यांची भेट घेतली.
तसेच बेळगावातील राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगासाठी कायमस्वरूपी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी त्यांच्यासमोर मांडली. तेंव्हा मंत्री महोदयांनी मागणीची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबरोबरच त्या संदर्भात आमदार सेठ यांच्यासह उद्या गुरुवारी आंदोलन स्थळी भेट देण्याचे आश्वासन दिले.
आजच्या दिवसाच्या धरणे आंदोलनाची समाप्ती झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे यांनी सांगितले की, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियाप्पा यांनी बेळगाव येथील कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निर्वाचन अधिकारी नियुक्तीसंदर्भात आवश्यक पावले तात्काळ उचलली जातील असे आश्वासन बेळगाव बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीला दिले आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव बार असोसिएशनच्या निवेदनाची दखल घेत बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी यापूर्वीच आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. या परिस्थितीत उद्या गुरुवारी मंत्री मुनियप्पा बेळगाव बार असोसिएशनच्या आंदोलन स्थळी भेट देऊन न्यायाधीशांच्या मागणीसंदर्भात पदाधिकारी व वकिलांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकार आमच्या मागणी संदर्भात तात्काळ पावले उचलेल, असा आम्हाला विश्वास वाटतो असे ॲड. दिवटे म्हणाले.
ॲड. एन. आर. लातूर यांनी यावेळी बोलताना गेल्या तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आमचे हे आंदोलन सुरू आहे. आज अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियाप्पा यांनी आंदोलन स्थळी आमची भेट घेऊन आमच्या मागणीची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे आजचे आमचे आंदोलन आम्ही थांबवत आहोत. मंत्री महोदय उद्या गुरुवारी आमचे आंदोलन स्थळी भेट घेण्याचे आश्वासन देण्याद्वारे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे सांगितले.


