बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर शिवारात पिकांना पाणी देण्यासाठी शेतांमध्ये बसवण्यात आलेल्या आयपी सेट्सच्या किमती तांब्याची तार असलेल्या विद्युत वायरी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले असून यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने संबंधित चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
येळ्ळूर शिवारामध्ये स्थानिक आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांचे अनेक आयपी सेट्स आहेत. सदर आयपी सेटची जवळ कांही अंतरावर असलेल्या मीटरला जोडलेली विद्युत वायर कापून लंपास करण्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. आयपी सेटच्या या वायरमधील विद्युत तार ही तांब्याची असल्यामुळे तिला बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळेच चोरट्यांची नजर आता येळ्ळूर शिवारातील या वायरिंवर पडली आहे.
गेल्या कांही दिवसात सुमारे 10 ते 15 शेतकऱ्यांच्या शेतातील आयपी सेटच्या विद्युत वायरी कापून लांबविण्यात आल्या आहेत. शहराजवळच्या शेत-शिवारांमध्ये रंगीत पार्ट्या आणि नशाबाजी करण्याचे गैरप्रकार गेल्या कांही वर्षांपासून वाढले आहेत. येळ्ळूर शिवार देखील त्याला अपवाद नाही.
चोरट्यांव्यतिरिक्त शिवारात गैरप्रकार करणाऱ्या लोकांपैकी कांही जण संधी साधून आयपी सेटच्या वायरी चोरून नेत असावेत, असा शेतकऱ्यांचा कयास आहे.
या पद्धतीने सदर वायर लंपास करण्यात आल्यामुळे शेतीच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांना फटका पासून कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे. तरी पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित चोरट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह येळ्ळूर शिवारातील पीडित आयपी सेट मालक शेतकऱ्यांनी केली आहे.



