बेळगाव लाईव्ह:हिवाळी अधिवेशन जवळ आल्यामुळे कडाक्याच्या थंडीतही शहरातील बी. एस. येडीयुरप्पा रस्त्याशेजारी भूमिगत विद्युत वाहिनी जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र काल शनिवारी रात्री पहावयास मिळाले.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन येथे 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये सुरू होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून दिवस-रात्र एक करून आवश्यक विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. सध्या शहर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून दुपारच्या वेळी देखील हवेत गारठा जाणवत आहे.
थंडी प्रचंड वाढल्यामुळे सायंकाळनंतर रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झाली आहे. तथापि कमालीच्या गारठ्यातून सरकारी कामाला जुंपलेल्या कामगारांची मात्र सुटका नसल्याचे चित्र काल शनिवारी रात्री 10 वाजता शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर पाहायला मिळत होते. येडीयुरप्पा मार्गाशेजारील भूमिगत विद्युत वाहिन्या जोडणीचे काम सध्या अहोरात्र वेगाने सुरू आहे.
सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे सदर कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवाबत्तीसह मोठी शेकोटी पेटवली जात आहे. या शेकोटीच्या उबेत थंडीपासून स्वतःचे रक्षण करत कामगारवर्ग खुदाई आणि विद्युत वाहिनी जोडणीचे काम करताना दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी गारठा वाढलेला असताना सुरू असलेले हे काम बी. एस. येडीयुराप्पा मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष वेधून घेत आहे.



