बेळगाव लाईव्ह :केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे 5 वर्षानंतर आता कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका होणार की बोर्ड स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन होणार? हा मुद्दा चर्चेला आला आहे.
देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डांचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
लखनौ कॅन्टोन्मेंट बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना ही माहिती उघड झाली आहे. त्या अनुषंगाने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड तयारीला लागल्याचे कळते. गेल्या पाच वर्षात कॅन्टोन्मेंट बोर्डने दरवर्षी निवडणूक मतदार यादी अपडेट केली आहे मध्यंतरी बोर्ड बेळगाव महानगरपालिकेमध्ये विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. महापालिकेकडून देखील बोर्डाची माहिती मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत उपाध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका फेब्रुवारी 2015 मध्ये झाल्या होत्या. पुढे 2020 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर कालावधी प्रत्येकी 6 महिन्यांनी वाढवला गेला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयाने सर्व बोर्ड बरखास्त केले.
त्याचवेळी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डवर सुधीर तुपेकर यांची निवड झाली. आजतागायत ते सरकार नियुक्त सदस्य म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामकाजात मदत करत आहेत. सुधीर तुपेकर यांच्या व्यतिरिक्त कोणीच लोकनियुक्त सदस्य बोर्डावर नाहीत.


