बेळगाव लाईव्ह :जुनी महापालिका इमारत असलेल्या सध्याच्या नव्या तहसीलदार कार्यालय आवारातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाली अभावी अस्वच्छतेमुळे पार दुर्दशा झाली असून महापालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
रिसालदार गल्ली येथील नव्या तहसीलदार कार्यालय आवारातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची देखभाली अभावी अलीकडे अत्यंत दुर्दशा झाली आहे. महापालिकेकडून या स्वच्छतागृहांची वेळच्यावेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे सध्याही स्वच्छतागृह अस्वच्छतेचे आगार बनली आहेत.
पाण्याचा स्पर्शही न झाल्यामुळे गुटखा, पान यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंतींसह या स्वच्छतागृहांमध्ये सर्वत्र गाळ केरकचरा साचून राहिला आहे. परिणामी निर्माण होणाऱ्या प्रचंड दुर्गंधीचा त्रास तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह साफसुतरे नसल्यामुळे त्यांची गैरसोयही होत आहे.
काही जणांना नाईलाजाने सदर अस्वच्छ स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत असला तरी त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. तरी महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वरिष्ठांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नव्या तहसीलदार कार्यालय आवारातील स्वच्छतागृहांची ताबडतोब स्वच्छता करण्याचे आदेश द्यावेत. तसेच यापुढे त्यांची व्यवस्थित देखभाल होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेकडून होत आहे.



