बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या अत्यंत वर्दळीच्या तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, तातडीने दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पुलाच्या निकृष्ट कामामुळे सहा महिन्यांपासून त्रास सहन करणाऱ्या संतप्त नागरिकांनी मात्र आता केवळ गुणवत्तापूर्ण काम करण्याची आणि किमान पाच वर्षांसाठी त्याची टिकाऊ क्षमता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. आज काम पूर्ण झाल्यास उद्यापर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामात, खराब झालेल्या भागातील काँक्रीटवरील जुना डांबर पूर्णपणे काढण्यात आला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यास, हा महत्त्वाचा पूल उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. तिसऱ्या रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पहिले आणि दुसरे रेल्वेगेट याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच चौथे रेल्वे गेट आधीपासूनच बंद असल्यामुळे बेळगावमधील वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
या सहा महिन्यांच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रियांमध्ये कामाच्या गुणवत्तेवर आणि प्रशासनाच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक आठवडा लागला तरी चालेल, पण ही समस्या पुढील पाच वर्षांसाठी तरी सुटायला हवी,” अशी मागणी एका नागरिकाने केली. पुलाच्या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त करताना, “पुन्हा केलेला रस्ता अनेक वर्षे चांगला टिकावा,” अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी कंत्राटदाराकडून जबाबदारीची मागणी करताना, “कामाच्या गुणवत्तेत कसूर झाल्यास करदात्यांना कंत्राटदाराच्या घरासमोर आंदोलन करता यावे म्हणून कंत्राटदाराचे नाव आणि पत्ता असलेला फलक लावावा,” अशी आग्रही सूचना एकाने केली. “कंत्राटदारासोबत कामगिरीचा करार केला आहे की नाही?” तसेच “आमदारांनी तीन वर्षांच्या गॅरंटीचा उल्लेख केला होता, तो पाळला जाईल का?” असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
यावर “सरकारी कामाला कोणतीही वॉरंटी किंवा गॅरंटी नसते,” अशा शब्दांत एका नागरिकाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबतच, “सहा महिन्यांपासून झालेल्या त्रासाला जबाबदार कोण?” असा सवाल विचारण्यात आला, तर चौथ्या गेटचे काम आधी करायला हवे होते, अशी टीका झाली. तांत्रिक सुधारणा करताना, पुलावर ‘ओव्हरटेक करू नका’ क्षेत्राचे फलक लावण्याची आणि अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी झाली. तसेच, पाण्याचे निर्गम पाईप्स त्वरित जोडण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे.





