बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांना कच्चे मटण खाऊ घालणाऱ्या दोन महिलांवर कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कच्चे मटण दिल्याने परिसरातील काही कुत्रे आक्रमक होत असल्याची तक्रार करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः गृहशाळा आणि निवासी वसाहतींच्या भागात नागरिकांना सुरक्षिततेची चिंता भासू लागली आहे. रहिवाशांचा आरोप आहे की कच्चे मटण मिळाल्याने भटक्या कुत्र्यांची आक्रमक प्रवृत्ती वाढते व नागरिकांवर हल्ल्याचा धोका निर्माण होतो.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणे मनाई आहे. कुत्र्यांना खाऊ घालायचा असल्यास ते केवळ नियोजित किंवा खाजगी जागेतच करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बेळगाव शहरात शांतता व सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून अशा घटना पुन्हा आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
तक्रारदारांनी म्हटले आहे की,
“महानगरपालिका कुत्र्यांचे लसीकरण व पकड मोहीम सुरू करते. मात्र काही व्यक्ती जाणून बुजून त्यांना कच्चे मटण टाकून आकर्षित करत आहेत. त्यामुळे कुत्रे तिथून जाण्याऐवजी वस्तीमध्येच स्थिर झाले असून धोका वाढला आहे.”




