बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेने शहर उपनगरातील भटक्या कुत्र्यांविरुद्ध मोहिम उघडली असली तरी त्यांचा उपद्रव कमी झालेला नसून अनगोळ येथे या कुत्र्यांनी एका कार गाडीचे सुमारे लाखभराचे नुकसान केल्याची घटना गेल्या मंगळवारी रात्री घडली.
अलीकडच्या काळात बेळगाव शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम उघडली असती तरी या कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. ही भटकी कुत्रे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर हल्ला करण्याबरोबरच अन्य उपद्रवही करत असतात.
त्यापैकी प्रमुख उपद्रव म्हणजे दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान करणे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अनगोळ मुख्य रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्या वेळी रॉयल कोल्ड्रिंक्स येथील रस्त्याशेजारी पार्क केलेल्या केलेल्या एका कारचे नुकसान केले. गेल्या मंगळवारी घडलेल्या या घटनेत भटक्या कुत्र्यांनी कार गाडीच्या बोनेटवर आणि एका बाजूला मोठ्या प्रमाणात ओरखडे पाडले.
त्याचप्रमाणे कांही ठिकाणी कुत्र्याने चावे घेतल्याच्याही खुणा दिसून आल्या. या प्रकारामुळे संबंधित कार मालकावर दुरुस्तीसाठी एक लाखाहून अधिक खर्च करण्याची वेळ आली आहे. या पद्धतीने रस्त्यावर अथवा घरांच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे ही भटकी कुत्री सातत्याने नुकसान करत आहेत.
दुचाकी वाहनांना ओरखडे पाडणे, त्यांच्या सीटची कव्हर फाडणे, गाडीवर शौच करणे वगैरे उपद्व्याप या कुत्र्यांकडून केले जात असतात. कुत्र्यांच्या या उपद्रवामुळे महापालिका खरोखरच या विषयावर कांही उपाययोजना करत आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या आठवड्यात या भटक्या कुत्र्यांमुळे एकाचा जीव गेला आहे.
तसेच ब्रह्ममंदिर पापमळा शिवाजी कॉलनी टिळकवाडीजवळ या भटक्या कुत्र्यांमुळे एकजण गाडीतून पडून जखमी झाला. प्राणीप्रेमींनी देखील याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे तसेच महापालिकेने आपली मोहीम अधिक तीव्र करून अनगोळ, टिळकवाडी वगैरे उपनगरातील भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर परिणामकारक बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.



