बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या स्मार्ट सिटी-2 निविदा प्रक्रियेवर ठेकेदारांनी मिळवलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली असून त्यामुळे सदर कामासाठी ठेकेदार निश्चित करण्याचा बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेळगाव शहरासाठी मंजूर झालेली स्मार्ट सिटी-2 ही योजना अडचणीत सापडली होती. योजनेतील कामांचा आराखडा तयार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर हरकती घेत बेळगावातील काही ठेकेदारांनी बेंगळुरू उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्या वेळी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याने योजना रद्द होण्याची भीती निर्माण झाली होती.
येत्या डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदार निश्चित झाला नाही, तर या योजनेतून मंजूर झालेला 135 कोटी रुपयांचा निधी हुबळी-धारवाड महापालिकेकडे वळविला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थगिती उठवण्यासाठी स्मार्ट सिटी विभागाकडून प्रयत्न सुरू होते.
या न्यायालयीन लढ्याचे नेतृत्व बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालिका शुभा बी. यांनी केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून गेल्या सोमवारी झालेल्या सुनावणीत निविदा प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. तथापि, याचिकाकर्त्या ठेकेदारांकडून या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
स्मार्ट सिटी-2 या योजनेतून मंजूर झालेल्या 135 कोटी रुपयांच्या निधीतून बेळगावमध्ये घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित 5 महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांचा थेट फायदा महापालिकेला होणार असल्याने पालिकेसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.




