बेळगाव लाईव्ह :पोलीस प्रशासन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांचा उच्छाद सुरूच असून काल रात्री शहराच्या भरवस्तीतील पांगुळ गल्ली येथील तीन दुकाने फोडून चोरट्याने दुकानातील साहित्य लंपास केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पांगुळ गल्ली येथील लेडीज पर्स वगैरे बॅगा विक्रीचे दुकान आणि दोन कपड्याच्या दुकानांचे शटर बेमालूमपणे उचकटून तोडून तीनही दुकानातील रोख रक्कम आणि साहित्य चोराने लंपास केले आहे. चोरीच्या सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाल्या आहेत.
त्यामध्ये दुकानाचे शटर तोडून आत घुसलेला चोरटा आपल्याकडील बॅटरीच्या प्रकाश झोताच्या सहाय्याने रोख रक्कम आणि किमती साहित्याची शोधाशोध करत असल्याचे पहावयास मिळते. चोरीचा सदर प्रकारा सकाळी निदर्शनास येताच तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करण्याबरोबरच तपास कार्य हाती घेतले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.


