बेळगाव लाईव्ह :बेळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रमुख रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासंदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज मंगळवारी नैऋत्य रेल्वे विभागाच्या महाव्यवस्थापकांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
सदर आढावा बैठकीचा थोडक्यात सारांश पुढील प्रमाणे आहे. 1) बेळगाव-कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्ग : खासदार शेट्टर यांनी प्रस्तावित नवीन मार्गाबाबत अद्ययावत केलेली माहिती मागितले. त्यावेळी त्यांना माहिती देण्यात आली की धारवाडजवळील सुमारे 16 एकर जमीन वगळता जमीन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की उर्वरित जमीन राज्य सरकारकडून हस्तांतरित होताच निविदा मागवल्या जातील. खासदारांनी आश्वासन दिले की ते जमिनीच्या लवकर हस्तांतरणाकरिता राज्य अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करतील.
2) लोकापुरा-रामदुर्ग-सौंदत्ती-धारवाड मार्ग : खासदारांनी या नवीन मार्गाच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या स्थितीचा देखील आढावा घेतला. यावेळी रेल्वे अभियंत्यांनी मंजुरीसाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आधीच सादर करण्यात आला असल्याचे सांगितले. तेंव्हा खासदार शेट्टर यांनी सदर मार्गामुळे रामदुर्ग, सौंदत्ती आणि शिरसंगी येथील प्रमुख मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होईल यावर भर देताना अधिकाऱ्यांना मंजुरीसाठी सक्रियपणे पाठपुरावा करण्यास सांगितले.
3) बेळगावातील तिसऱ्या रेल्वे गेट आरओबीच्या दुसऱ्या मार्गाच्या कामात विलंब : लेव्हल क्रॉसिंग क्र. 381 (तिसरे रेल्वे गेट) येथील आरओबीच्या दुसऱ्या मार्गाचे (लेन) काम सुरू करण्यात येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केल्या.
त्यावेळी खासदारांनी त्यांना वाहतूक वळवण्याची परवानगी मिळविण्यासाठी पोलिस विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे महाव्यवस्थापकांनी देखील पथकांना घटनास्थळी भेट देण्याचे आणि काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.
4) प्रधानमंत्री अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत बेळगाव रेल्वे स्थानकावरील विकास मंद गतीने : बेळगाव स्थानकाची आधुनिक पद्धतीने सुधारणा केली जात असली तरी मंद गतीने होणारी प्रगती आणि सार्वजनिकांच्या तक्रारी यांची खासदार शेट्टर यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना लिफ्ट, एस्केलेटर आणि फूट ओव्हरब्रिजचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच घटप्रभा रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हरब्रिज जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.
5) नवीन रेल्वे सेवांची मागणी : खासदारांनी बेळगाव-मानगुरु, बेळगाव-मडगाव-उडुपी-मानगुरु आणि बेळगाव-चेन्नई (तिरुपती मार्गे) मार्गांवर नवीन रेल्वे गाड्यांसह अनेक रेल्वे सेवांबाबत विनंत्या मांडल्या. त्याचप्रमाणे बेळगाव-बेंगलोर वंदे भारत रेल्वे सकाळी 6 वाजता बेळगावहून निघावी आणि हुबळी-बेळगाव-पुणे वंदे भारत रेल्वे सेवा आठवड्यातून तीन वेळा चालवण्याऐवजी दररोज चालवावी, असेही खासदार जगदीश शेट्टर यांनी सुचवले.


