बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांची प्रगती पाहण्यासाठी बेंगळुरू येथील विकास सौधमध्ये झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचे गुणवत्तेनुसार व वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही कामे संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर देरीस जबाबदार असलेल्या अडथळ्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कामांची गुणवत्ता, प्रकल्पांचे जनहिताशी असलेले संबंध तसेच त्यांच्या कार्यक्षमतेबाबत सविस्तर चर्चा बैठकीत झाली. प्रत्येक प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावा, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई टाळता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





