बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्त्यांचे योगदान आहे. मात्र एकट्या एखाद्या व्यक्तीमुळेच सरकार सत्तेवर आले असे म्हणणे मला मान्य नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव शहरात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक नेते, आमदार आणि कार्यकर्ते एकत्र येऊन काम केल्यामुळे राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. पण फक्त एकाच व्यक्तीने सरकार सत्तेत आणले असे म्हटले तर आम्ही ते मान्य करणार नाही, असे ते म्हणाले.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचना यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान, सीएम रेस मध्ये गृह मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची दमदार एन्ट्री झाली आहे. मी देखील मुख्यमंत्रीपदाचा इच्छुक आहे, असे विधान खुद्द गृह मंत्री जी. परमेश्वर यांनी केले आहे.
मी देखील मुख्यमंत्रीपदाचा इच्छुक, सीएम रेसमध्ये आहे, मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे या जी. परमेश्वर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, जी. परमेश्वर यांना मुख्यमंत्री होण्याची पूर्ण पात्रता आहे. २०१३ मध्ये सरकार सत्तेत आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. परमेश्वर यांच्या विधानात चूक काय आहे? काँग्रेसला सर्वाधिक पाठिंबा देणारे एससी, एसटी, ओबीसी समाजाचे लोक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढेते म्हणाले की, मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय हा हायकमांडचा विषय आहे. पण एकट्या व्यक्तीमुळेच सरकार सत्तेत आले हे मला मान्य नाही. सरकार स्थापन करण्यासाठी अनेकांचे श्रम आहेत, हे कोणीही विसरू नये, असे ते म्हणाले.




