बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात संकेत दिले असून जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या बाजूने आम्ही आहोत आणि सरकार लवकरच यावर निर्णय घेईल, असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे.
राज्योत्सव कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्याच्या विभाजनासाठी सर्व स्थानिक नेत्यांनी सरकारवर दबाव आणल्याचेही उघड केले. याव्यतिरिक्त, त्यांनी मराठी भाषिकांच्या ‘काळ्या दिवसा’च्या आंदोलनावर कठोर कारवाईचा इशारा देत मराठी भाषिकांचा रोषही ओढवून घेतला आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा मांडताना सांगितले, “मी सरकारवर दबाव आणला आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन व्हावे, असे जिल्ह्याच्या सर्व नेत्यांनी सरकारला कळवले आहे. शक्य तितक्या लवकर सरकार याबाबत निर्णय घेईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या विधानामुळे बेळगावच्या विभाजनाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. जिल्हा विभाजन झाल्यास प्रशासकीय कारभाराला गती मिळेल आणि विकासाचे विकेंद्रीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सीमाभागातील वादावर मात्र ठोस तोडगा निघाला नसल्याचे मान्य करत आणि कन्नड-मराठी सलोख्यासाठी ठोस उपायांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सीमाप्रश्न आणि ‘काळा दिवस’ आंदोलनासंदर्भात जारकीहोळी यांनी प्रशासकीय कारवाईचे संकेत दिले. ते म्हणाले की, ‘काळा दिवस’ साजरा करणाऱ्यांविरुद्ध प्रत्येक वेळी गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, आंदोलनाच्या परिसरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यावरही चर्चा केली जाईल.
याशिवाय, ‘काळ्या दिवसा’च्या बंदोबस्तात म. ए. समितीच्या नेत्यासोबत सेल्फी घेऊन वाद ओढवून घेतलेल्या सीपीआय अधिकाऱ्याच्या कृत्याबद्दल आयुक्तांना कारवाईचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.


