बेळगाव लाईव्ह :राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 14 वा पदवीदान सोहळा उद्या मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे संपन्न होणार असून याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती राणी चन्नम्मा विद्यापीठाचे (आरसीयु) उपकुलगुरू सी. एम. त्यागराज यांनी दिली.
बेळगाव माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयामध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पर्यावरण व ग्रामीण विकास सेवेसाठी शिवाजी कागणीकर, शिक्षण व समाजसेवेसाठी सुरेंद्र दोड्डणावर आणि समाजसेवेसाठी बसवराज यलीगार यांना मानद डॉक्टर प्रदान केली जाईल, असे उपकुलगुरू त्यागराज यांनी सांगितले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 14 व्या पदवीदान सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्यपाल थावरचंद गहलोत भूषवणार आहेत. सोहळ्याला उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. पी. सुधाकर हे देखील हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते या नात्याने इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए एन किरणकुमार मार्गदर्शन पर विचार व्यक्त करतील.
सोहळ्यामध्ये 38,485 पदवीधर विद्यार्थी -विद्यार्थिनी, 36,642 स्नातक विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि 1,843 स्नातकोत्तर विद्यार्थी -विद्यार्थिनींना पदव्या प्रदान केल्या जाणार असून यामध्ये 125 विद्यार्थी रँक होल्डर अर्थात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक विजेते आहेत, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये गेल्या 18 महिन्यांमध्ये तीन पदवीदान सोहळे झाले आहेत. स्नातकोत्तर निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 50 दिवसात हा पदवीदान सोहळा आयोजित केला जात असून असे पहिल्यांदाच घडत असल्याचे सांगून हिरेबागेवाडी येथे विद्यापीठाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे.
त्या ठिकाणी पुढील वर्षापासून शैक्षणिक उपक्रमांना प्रारंभ होणार आहे. मागील 2024 साली प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानांतर्गत संशोधन, प्रयोगशाळा आणि अन्य विकास कामांसाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान राणी चन्नम्मा विद्यापीठाला मंजूर झाले आहे, अशी माहिती शेवटी उपकुलगुरू सी. एम. त्यागराज यांनी दिली. पत्रकार परिषदेस संतोष कामगौड, नदाफ यांच्यासह वरिष्ठ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.


