बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान बेळगाव शहरात पाच जणांवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या हल्ल्यात पाच युवक गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना बीम्स रुग्णालयात तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना बेळगावातील सदाशिवनगर परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ घडली आहे राज्योत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ मिरवणुकीदरम्यान अचानक काही हल्लेखोरांनी चाकू व जांबिया घेऊन गर्दीत घुसून हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाले.
जखमींची नावे गुरुनाथ वक्कुंद, सचिन कांबळे, लोकेश बेटगेरी, महेश, विनायक आणि नझीर पठाण अशी आहेत. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
युवतींची छेड पोलिसांचा लाठीमार – राजोत्सव मिरवणुकी दरम्यान शनिवारी रात्री चन्नमा चौकात गर्दीत युवतींची छेड काढण्याची घटना घडली यामुळे पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.


