बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन (BDFA) मधील गैरव्यवस्थापन, आर्थिक गैरव्यवहार आणि न्याय्य निवडणुकांचे उल्लंघन याविरोधात आज बेळगावमधील फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, संघाचे पदाधिकारी आणि चाहत्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात शेकडो फुटबॉल प्रेमींनी एकत्र येत संघटनेत पारदर्शकता आणण्याची आणि खेळाडूंना न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी केली.मोर्चादरम्यान आंदोलक फुटबॉल प्रेमींनी “बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेत पारदर्शकता आणा”, “न्याय्य निवडणुका घ्या”, “खेळाडूंना न्याय द्या” अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना फुटबॉल प्रेमींनी सांगितले की, BDFA चे सध्याचे नेतृत्व 14 वर्षांहून अधिक काळ सत्तेत असून कर्नाटक स्टेट फुटबॉल असोसिएशनच्या (KSFA) नियमांनुसार अध्यक्षपदाची 12 वर्षांची कमाल मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन करून संघटनेवर एकछत्री कारभार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच संघटनेच्या निधीचा गैरवापर, 9.25 लाखांपेक्षा जास्त रकमेची संशयास्पद पैसे काढणी, 2023-24 च्या लोकमान्य ट्रॉफीच्या विजेते आणि उपविजेत्यांना देय असलेली बक्षीस रक्कम न देणे, तसेच मागील दोन आर्थिक वर्षांची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) न घेणे हे गंभीर आरोप या वेळी मांडण्यात आले.
4 जून 2025 रोजी KSFA ने BDFA वर निलंबन कारवाई करून चौकशी सुरू करण्याचे आणि 5 जुलै 2025 पर्यंत नवीन निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कोणतेही ठोस कारण न देता हा आदेश मागे घेण्यात आला. यामुळे प्रक्रियेची पारदर्शकता आणि न्याय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
फुटबॉल प्रेमींच्या प्रमुख मागण्या
- KSFA च्या BDFA निलंबनाच्या आदेशाची तात्काळ पुनर्स्थापना
- AIFF च्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी समितीची नियुक्ती
- तटस्थ निरीक्षकांच्या उपस्थितीत मुक्त व न्याय्य निवडणुका
- बक्षीस रक्कम तत्काळ वितरित करणे व लेखापरीक्षित आर्थिक अहवाल जाहीर करणे
“ही लढाई फुटबॉल विरोधात नाही, ती फुटबॉलसाठी आहे. आम्हाला फक्त न्याय आणि पारदर्शकता हवी आहे,” असे एका क्लब प्रतिनिधीने सांगितले.
आंदोलक लवकरच या संदर्भातील पुराव्या सह तक्रार ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) कडे सादर करणार आहेत.यावेळी फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




