बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये बसून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड बेळगाव सीसीबी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणातील 33 आरोपींना शुक्रवारी तिसऱ्या जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 15 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बॉक्साईट रोडवरील खाजगी इमारतीत हे कॉल सेंटर गेल्या 8 मार्च 2025 पासून सुरू होते. येथे उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह विविध राज्यांमधील 33 जण काम करत होते.
हे सर्वजण अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक करणारे कॉल करत असल्याचा आरोप आहे. सदर कॉल सेंटरवर बेळगाव सीसीबी पोलिसांनी छापा टाकून 37 लॅपटॉप, 37 मोबाईल फोन, 3 वायफाय रुटर यासह विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सदर प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सीआयडीची मदत घेण्यात येणार आहे सीआयडीच्या मदतीने इंटरपोलशी संपर्क केला जाणार आहे.
सदर प्रकरणातील दोन प्रमुख आरोपी फरारी झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापण्यात आले आहे.





