बेळगाव लाईव्ह : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियमांचे उल्लंघन करून वयोवृद्ध माजी सैनिकावर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडला आहे. हेल्मेट नसल्याच्या कारणावरून थांबवलेल्या माजी सैनिकाला 4–5 पोलिसांनी बूटांनी मारहाण करत जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
घटनेनुसार, नंदगडमधील एका सार्वजनिक चौकात हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी एका वयोवृद्ध माजी सैनिकाला थांबवले. यावेळी अनुचित रित्या बळाचा वापर करत त्यांना बूटांनी मारहाण करण्यात आली आणि ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. ही संपूर्ण घटना नागरिकांच्या मोबाइलमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
स्थानिक पत्रकारांनी या प्रकरणी नंदगड पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता, “हेल्मेट नव्हते, कागदपत्रे नव्हती, वाहन थांबवले नाही आणि संबंधित माजी सैनिकांनी आमच्यावर हात उगारला,” असे म्हणत निरीक्षकांनी विषय झटकून टाकला. पत्रकारांनी बॉडी कॅमेरा फुटेजची मागणी केली असता “मी सभेत आहे” असे सांगून निरीक्षकांनी फोन कट केला. त्यानंतर पीएसआय यांनीही जवळजवळ त्याच स्वरातील उत्तर दिले.
मात्र प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावत, “वयोवृद्ध व्यक्ती पोलिसांवर हात उगारू शकत नाही; चूक पूर्णपणे पोलिसांचीच आहे,” असा ठाम आरोप केला आहे.
कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करणे हेच पोलीसांचे कर्तव्य असते. परंतु बूटांनी मारहाण करून पोलिसी दहशत निर्माण करणे हे पूर्णतः गैर असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या घटनेने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून गृह मंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. “देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचा सन्मान करण्याऐवजी त्याला बूटांनी मारहाण करणे हे मानवतेलाही काळिमा फासणारे कृत्य आहे. नंदगड पोलिसांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी,” अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.




