बेळगाव लाईव्ह : तीव्र वेदनांनी त्रस्त होऊन बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था (बीम्स) येथे दाखल झालेल्या एका महिलेच्या शरीरातील प्रचंड मोठ्या आकाराचा फायब्रॉइड गर्भाशय यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात बीम्सच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना यश आले आहे.
सुमारे ४२ वर्षीय महिलेच्या गर्भाशयात गाठ झाली होती, ज्यामुळे गर्भाशयाचा आकार वाढत होता. तसेच, मासिक पाळीच्या वेळी तिला तीव्र रक्तस्त्राव होत होता. यामुळे महिला तीव्र ॲनिमिया (रक्तक्षय) आणि वेदनांनी त्रस्त होती. अलीकडेच तिला बीम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता, गर्भाशयाचा आकार ३२ आठवड्यांच्या गर्भवती महिलेएवढा मोठा झाल्याचे आढळले. तात्काळ स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया केली आणि ३.७ किलोग्रॅम वजनाची मोठी फायब्रॉइड गाठ असलेला गर्भाशय यशस्वीरित्या काढून टाकला. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती आता सुधारली आहे.
डॉक्टरांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल बीम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सिद्धू हुळ्ळोळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ईरन्ना पल्लेद, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोजा तिगडी यांनी अभिनंदन केले आहे.
स्त्रीरोग शास्त्रज्ञ डॉ. वसंत कब्बूर, डॉ. लक्ष्मी के.एस., डॉ. निखिल वेर्णेकर, डॉ. गौसिया गोरीखान आणि भूलतज्ज्ञ (ॲनेस्थेशिया तज्ज्ञ) डॉ. साजिद हुसेन नदाफ, डॉ. पूर्णिमा, डॉ. अड्रुस्टा, डॉ. रेनिता डिकोंसा, नर्सिंग अधिकारी मल्लव्वा काडेशनवर आणि इतर कर्मचाऱ्यांचा या यशस्वी शस्त्रक्रिया पथकात समावेश होता.





