बेळगाव लाईव्ह :: वाहतूककोंडी ही शहरातील अत्यंत गंभीर समस्या बनली असताना शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसाठी बालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी तुकडीने दुसऱ्या रेल्वे गेटवर एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दुसरे रेल्वे गेट परिसरात नेहमीच प्रचंड वाहतूक गर्दी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत एनसीसी कॅडेट्सनी केवळ एका बाजूने वाहनांची वाहतूक चालू ठेवत अतिशय प्रभावीरीत्या रहदारी सुरळीत केली. वाहतूक नियमांचे स्वतः पालन करून प्रवाशांनाही शिस्त लावण्यात त्यांनी यश मिळवले.
या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजविण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एनसीसी अधिकारी ऐश्वर्या नेसरकर, विश्वास गावडे, उमेश बेळगुंदकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि संचालक मंडळाने या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
अशा उपक्रमांमुळे लहान वयातच समाजाबाबतची जबाबदारी आणि शिस्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




