बेळगाव लाईव्ह : बागलकोट जिल्ह्याचे पालकमंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बेळगावातील मराठी अस्मितेच्या आंदोलनावर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर थेट तोंडसुख घेतले आहे.
सीमाभागात ‘जय महाराष्ट्र’ घोषणा देणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांना त्यांनी ‘समाजकंटक’ ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची वलग्ना त्यांनी केली आहे.
मंत्री तिम्मापूर यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटक सरकारची म. ए. समितीविरोधातील भूमिका अधिक स्पष्ट झाली असून लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याच्या मराठी भाषिकांच्या हक्कावर नेहमी गदा आणणाऱ्या कर्नाटक प्रशासनाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सीमाभागात उमटत आहे.
‘काळ्या दिवसा’च्या बंदोबस्तादरम्यान म. ए. समितीचे नेते शुभम शेळके यांच्यासोबत सेल्फी घेणाऱ्या माळमारुती पोलीस स्टेशनच्या सीपीआय अधिकाऱ्याच्या कृत्यावरही तिम्मापूर यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या पोलीस अधिकाऱ्यावरही निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत देत कर्नाटक सरकार आणि येथील मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लोकशाही हक्कांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहेत, हे या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे.





