बेळगाव लाईव्ह: बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक सरकारच्या येत्या आठ डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात दरवर्षीप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून तो यशस्वी करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला.
खानापूर रोड, बेळगाव येथील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिरमध्ये झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर 2025 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होत आहे.
त्याला विरोध म्हणून गेल्या 2006 पासून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत असते. समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये यावेळी देखील महामेळावा घेण्याचे निश्चित करून त्याच्या आयोजनासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.
समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांचा काल, तर समिती नेते रामचंद्र मोदगेकर यांचा आज वाढदिवस आहे. आजच्या बैठकीचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस माजी आमदार किणेकर आणि मोदगेकर यांना शाल व हार घालून, तसेच उभयतांच्या हस्ते संयुक्तरित्या केक कापण्याद्वारे साजरा केला.
बैठकीस आर. आय. पाटील, लक्ष्मण होणगेकर, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, नारायण कालकुंद्री, कांतेश चलवेटकर, मोहन बेनके, विठ्ठल पाटील, सहदेव परीट, विठ्ठल मजूकर, शिवाजी शिंदे, एम. जी. पाटील आदींसह बेळगाव तालुक्याच्या विविध गावातील बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, कर्नाटक सरकार येत्या डिसेंबर महिन्यात बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन घेणार आहे. हे अधिवेशन ज्या ज्या वेळी घेतले गेले त्या त्या वेळी या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून अधिवेशनाला विरोध नोंदवला आहे.
सीमाप्रश्नसंदर्भात 1956 पासून अनेक आंदोलनं आणि लढे झाले. त्या लढ्यांना यश न मिळाल्यामुळे 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर दावा दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारने 2006 मध्ये पहिल्यांदा बेळगावात हिवाळी अधिवेशन घेतले. कोणत्याही गोष्टीबद्दल न्यायालयीन दावा चालू असताना त्याची स्थिती, दर्जा बदलणं हा गुन्हा आहे. तथापि बेळगाव सीमाभागात आम्ही जर कानडीचे प्रस्थ वाढविले नाही तर आम्ही सीमाप्रश्नाचा दावा हरू, अशी कर्नाटक सरकारला भीती आहे.
त्या अनुषंगाने आपला दावा मजबूत करण्यासाठी कर्नाटक सरकारने या ठिकाणी दरवर्षी हिवाळी अधिवेशन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी गेल्या 2009 मध्ये त्यांनी या ठिकाणी विधानसौधची इमारतही उभी केली. या पद्धतीने कर्नाटक सरकारने बेकायदेशीर गोष्टी करण्यास सुरुवात केल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात डांबून आज 70 वर्षे झाली तरी महाराष्ट्रात जाण्याची आमची इच्छा आज देखील प्रबळ आहे. येथील मराठी भाषा व संस्कृती पुसून टाकणे कर्नाटक सरकारला कदापि शक्य होणार नाही, ही आमची भूमिका दाखवून देणे हा देखील महामेळावा आयोजित करण्यामागचा एक मुख्य उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील हा महामेळावा घेऊन तो आम्ही यशस्वी करणार आहोत. त्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती.
सध्या तालुक्यात सुगीचा मोसम सुरू असल्यामुळे बैठकीला कार्यकर्त्यांची उपस्थिती थोडी कमी असली तरी आपापल्या गावागावात ते महामेळाव्यासंदर्भात जनजागृती करतील असे सांगून महामेळाव्या दिवशी जास्तीत जास्त लोक धर्मवीर संभाजी महाराज चौकात येतील आणि आमचा महामेळावा यशस्वी होईल, असा विश्वास माजी आमदार मनोहर किणेकर यांनी शेवटी व्यक्त केला.


