बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर स्टेशन रोड येथे लक्ष्मी मंदिरामध्ये एक नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त सकाळी दहा ते एक पर्यंत लाक्षणिक उपोषण व दोन वाजता सभा संपन्न झाली,
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सूर्याजी सहदेव पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात जाण्याचा लढा असाच सुरू राहील असे सांगितले, तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुरेशराव देसाई यांनी सुद्धा केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून लढा तेवत ठेवण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकांनी सहकार्य करावे असे आव्हान केले, तसेच युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेवर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन दबाव घालून अन्यायाने केसेस करत आहेत हे चुकीचे असून शुभम शेळके यांच्या पाठीशी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती खंबीरपणे उभे आहोत, शुभम शेळके व धनंजय पाटील यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगितले.
कर्नाटक शिवसेनेचे उपप्रमुख के पी पाटील यांनी सुद्धा केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून सीमा चळवळ येथील कार्यामध्ये शिवसेना खांद्याला खांदा देऊन समिती बरोबर एकत्र लढेल असे बोलताना सांगितले, दयानंद चोपडे यांनी सुद्धा एकनिष्ठ समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून ही सीमा लढ्याची चळवळ अबाधित ठेवावी या चळवळीला ठेच पोचवणाऱ्या संधी साधू नेत्या पासून सावध रहावे, असे आवाहन केले.

खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील बोलताना म्हणाले समितीचे कार्य अखंड ठेवून प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क साधून इथून पुढे समितीची ताकद निर्माण करणे गरजेचे आहे व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एकत्रपणे कार्य केल्यास समितीला बळकटी येईल तर पी.एच. पाटील यांनी आपले विचार मांडताना महाराष्ट्र सरकारची दाखल केलेल्या दाव्याबद्दल उदासीनता स्पष्ट करताना खंत व्यक्त केली व महाराष्ट्र सरकारने समितीच्या नेत्यांशी संपर्कात राहून ताकदीनिशी लढा लढावा असे सांगितले,
यावेळी बळीराम पाटील, प्रकाश पाटील, मल्लाप्पा पाटील, राजू पाटील, विनायक सावंत, विलास बेडरे, अर्जुन केसरेकर, कल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा तोरगल, नारायण गुरव, वैराळ सुळकर, तुकाराम कोल्हेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




