बेळगाव लाईव्ह : पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे, पगार वाढ, नियमानुसार 8 तास काम वगैरे आपल्या विविध मागण्यासाठी इंडस टॉवर्स कंपनीचे तंत्रज्ञ कर्मचारी आणि भारतीय प्रायव्हेट टेलिकॉम मजदूर संघाच्या (बीपीटीएमएस) सदस्यांनी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून जोरदार निदर्शने केली.
इंडस टॉवर्स कंपनीने नोकर भरतीसाठी नव्या कंत्राटदाराला अधिकार देऊन कंपनीतील जुन्या कामगारांना नोकरीतून वजा केले आहे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवाज उठवला. सदर कर्मचाऱ्यांनी आपल्यावर झालेला अन्याय नमूद करताना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सदर आंदोलनात बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.
नव्या कंत्राटदाराला अधिकार देऊन नोकरीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा तात्काळ पूर्ववत कामावर रुजू करून घेतले जावे, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कामगार चळवळीत सहभाग घेतल्यास त्यांना नोकरीवरून काढू नये, कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी दिली जावी, राष्ट्रीय आणि सणाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जावी,
कामाचा कालावधी 8 तास इतका मर्यादित असावा, ओव्हर टाईम अर्थात जादा कामाचे नियमानुसार जास्त वेतन दिले जावे, सर्व कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय आणि अपघात विमा उतरवला जावा, कंपनीचे काम करत असताना एखाद्याचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जावी, इंडस टॉवर्स कंपनीने आपल्या कंत्राटदारांना त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार आवश्यक संरक्षण देण्याची सत्य सूचना करावी या सर्व मागण्या संदर्भात तात्काळ बीपीटीएमएसशी चर्चेला आरंभ केला जावा, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.
#Belagavi #BelgaumLive #IndusTowers #WorkersProtest #BelgaumNews #LabourRights #EmployeeWelfare #BPTMS #BelagaviUpdates #SocialJustice


