बेळगाव लाईव्ह :सध्या इंद्रायणी भाताचा दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. तेंव्हा सरकारने त्यांच्या हितासाठी इंद्रायणी भाताला 3000 ते 3500 रुपये दर देऊन बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना तारावे, अशी मागणी केली जात आहे.
मागील मे महिन्यापासून पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिप हंगामाची पेरणी केली. त्याचवेळी मोठा पाऊस होऊन पाणी -मुळका एक झाल्याने, तसेच बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे कांही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तसेच अर्धवट उगवण झाल्याने भात लावणी केली. दुबार खर्चामुळे संकटात असतानाही शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेऊन आपली शेतं हिरवी केली.
पीकं बहरात असताना पुन्हा अतिवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण होऊन कांही पिकं खराब झाली. आता मळणी हंगाम सुरु आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी बासमती, सोनम, दप्तरी, सुपर सोनमसह इतर भातपेरणी केल्यामुळे यावेळी इंद्रायणी भात पीकं कमी झाली. त्यामुळे महिनाभरापूर्वी व्यापारी इंद्रायणी भात 3500 प्रतिक्विंटल की आदराने खरेदी करत होते. तथापी आता शेतकऱ्यांनी भातं विकून आपला उदरनिर्वाह करायचा म्हंटल्यास इंद्रायणी 2700 ते 2800 रु. क्विटंल खरेदी केले जात आहे.
परिणामी अतिवृष्टीने खंगलेल्या शेतकऱ्यांना भाताचा दर घसरल्यामुळे पुन्हा एका तडाख्याला सामोरं जाव लागत आहे. तेंव्हा सरकारने या बेळगाव भागातील शेतकऱ्यांचा प्रामाणीकपणे विचार करुन इंद्रयणी भाताला प्रतिक्विंटल 3000 ते 3500 रुपये दर देऊन शेतकऱ्यांना तारावे. एकंदर इंद्रायणी भाताचा सध्याचा दर आणि मशागत, पेरणी, मजूर खर्च पहाता यात कुठेच ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.




