बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे एक पथक इंदूर या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा अभ्यास दौरा करून नुकतेच परतले आहे. बेळगावमध्ये कचरा व्यवस्थापन आणि शहरी स्वच्छतेत बदल घडवून आणण्याची कल्पना घेऊन आलेले हे पथक आता इंदूर-शैलीतील नवकल्पना अंमलात आणण्यास उत्सुक आहे. विशेषतः शहरातील कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वापर करून वास्तविक वेळेमध्ये कचरा विल्हेवाट लावण्याच्या कामांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्याची त्यांची उत्सुकता अधिक आहे.
महापौर मंगेश पवार या संदर्भात लवकरच आरोग्य विभागासोबत बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याबरोबरच निर्णय घेतले जातील. कचरा व्यवस्थापनासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वापर करण्याचा प्रस्ताव लवकरच स्मार्ट सिटी विभागाकडे सादर केला जाईल.
स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका शुभा बी. या महानगरपालिका आयुक्त म्हणून देखील काम करत असल्याने, या प्रस्तावाला जलद गती मिळण्याची शक्यता आहे. बेळगावच्या नगरसेवकांनी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा इंदूरला भेट दिली होती. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा 16 नोव्हेंबरपासून दौरा झाला.
पथकाने इंदूरच्या स्वच्छता कार्यांची पाहणी केली. ज्यामध्ये कचरा वर्गीकरण प्रक्रिया, बांधकाम कचऱ्याचा पुनर्वापर, कचऱ्यापासून सीएनजी उत्पादन आणि शहरव्यापी स्वच्छता प्रणालींचे निरीक्षण करणारे एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर यांचा समावेश आहे.
बेळगावमध्ये आधीच एक कमांड अँड कंट्रोल सेंटर असल्यामुळे अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की शहरभर स्वच्छता सुधारण्यासाठी याचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. ज्या भागात अंमलबजावणी प्रलंबित आहे, तिथे कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करण्याची आणि बांधकाम साहित्यावर प्रक्रिया सुरू करण्याची योजना देखील तयार होत आहे. एकंदर स्मार्ट सिटी कार्यक्रमांतर्गत 5 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच सुरू होण्याची अपेक्षा असून ज्यामुळे शहर स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी होणार आहे.


