Saturday, December 6, 2025

/

संविधान दिनानिमित्त तृतीयपंथीयांनी घडविले स्वाभिमानाचे प्रदर्शन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आपण देखील समाजाचा एक भाग असून आपल्यालाही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे समाजात वागणूक मिळावी, सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे आज संविधान दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी बेळगावमध्ये भव्य मिरवणूक काढून आपल्या व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रदर्शन घडविले.

ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी संविधान दिनानिमित्त सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिरापर्यंत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या रॅलीचे अर्थात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. कन्नड साहित्य भवन समोरील रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांच्या हस्ते रिबीन कापून तृतीयपंथीयांच्या मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.

सदर मिरवणुकीमध्ये बेळगाव जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांमधील अशा जवळपास 2500 तृतीयपंथीयांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. अग्रभागी रंगीबिरंगी फुग्यांची कमान, साडी, ड्रेस वगैरे आकर्षक पोशाखातील ताशाच्या तालावर नृत्य करणारे तृतीयपंथीय, अशी ही मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. रहदारीला अडथळा न आणता जल्लोषात मात्र शिस्तबद्धरीतीने निघालेल्या या मिरवणुकीची सांगता कुमार गंधर्व रंगमंदिर येथे झाल्यानंतर तेथे तृतीयपंथीयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 belgaum

तृतीयपंथीय मिरवणुकीच्या शुभारंभाप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या जिल्हा प्रवक्त्या किरण बेरी म्हणाल्या की, आज संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील तृतीयपंथीय आपल्या स्वाभिमानाचे प्रदर्शन घडवत आहेत. यासाठी बेळगाव जिल्हा सह आसपासच्या जिल्ह्यातील सुमारे 2500 तृतीयपंथीय येथे हजर आहेत. इतक्या मोठ्या संख्येने तृतीयपंथीय एकत्र करण्याचा उद्देश आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या संख्येचे दर्शन घडविणे हा आहे. जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही किती मोठ्या संख्येने आहोत हे लक्षात येईल आणि येत्या काळात ते आम्हाला सरकारी योजना व सुविधांचा लाभ मिळवून देतील. कारण आज देखील तृतीयपंथीयांना समाजात स्थान नाही, त्यांची निर्भत्सना केली जाते. त्यांना कोणत्याही सरकारी सेवा -सुविधा, योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे बहुतांश तृतीयपंथीयांना कष्टाचे जीवन जगावे लागत आहे.

त्यासाठी आज आम्ही खुल्या दिलाने स्वतःबद्दलचा अभिमान प्रकट करत आहोत. तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, त्यांना घरे मिळावीत, यासाठी लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याक संघटनेच्या माध्यमातून गेल्या 18 वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. एकंदर तृतीयपंथीयांना सरकारी योजनांचा लाभ मिळणे अत्यावश्यक आहे. आज कन्नड साहित्य भवन येथून कुमार गंधर्व रंग मंदिरापर्यंत आमची एक मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध आणि आकर्षक असते.

वर्षभर लोकांकडून निर्भत्सना सहन करणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी आजचा दिवस त्यांच्या हक्काचा दिवस आहे. संविधानचा आजचा 26 नोव्हेंबर हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. आजचा दिवस आमच्या स्वातंत्र्याचा दिवस असल्यामुळे तो आम्ही साजरा करत आहोत. मिरवणुकीनंतर कुमार गंधर्व रंगमंदिर येथे दुपारच्या जेवणानंतर सरकारी नामनिर्देशित अधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्यासमोर तृतीयपंथीयांच्या समस्या, त्यांचे हक्क, मागण्या वगैरे संदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, असे किरण बेरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.