belgaum

जंगलांचा ऱ्हास, वन्य प्राण्यांचा त्रास : वनखात्याच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह

0
62
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वनसंपदेच्या ऱ्हासामुळे आपला नैसर्गिक अधिवास गमावलेले वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधार्थ नागरी वसाहतींकडे फिरकू लागले आहेत. बेळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास खानापूर तालुक्यात हत्ती, अस्वल, बिबट्या वगैरे वन्यप्राणी लोकवस्तीत शिरण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. जंगलाचा ऱ्हास होत असल्यामुळे असे प्रकार घडत असून, जंगल आणि वन्यप्राण्यांच्या रक्षण-संवर्धनासाठी असलेल्या कर्नाटक वनखात्याच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


वनसंपदेच्या ऱ्हासामुळे वन्यजीव मानवी वसाहतीमध्ये येत आहेत का? तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीस कर्नाटक वनखाते जबाबदार आहे का? याबाबत बेळगाव लाईव्हने सोशल मीडियावर घेतलेल्या मतांनुसार प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.


वडगाव, बेळगाव येथील शेतकरी नेते राजू मरवे यांच्या मते, वनसंपदेचा ऱ्हास झाल्यामुळे तसेच पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत शिरून शेतकऱ्यांनी घामाने पेरलेल्या पिकांची हानी करत आहेत. मोठमोठे धनाढ्य लोक जंगलातील जमीन बेकायदेशीररित्या बळकावून तिथे फार्महाऊस किंवा हॉटेल बांधून व्यवसाय करत आहेत. वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरप्रकार चालू असल्याचा आरोप त्यांनी केला.

 belgaum


शेतकरी आपल्या शेताला विद्युतधारित तारेचे कुंपण घालून पिकांचे संरक्षण करण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे काहीजण सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून साध्यासरळ माणसांना धमकावून त्यांची जमीन बळकावून विक्री करत आहेत. या पद्धतीने शेतच कुंपण खात आहे. यात भर म्हणून कळसा-भांडूरा प्रकल्प जंगलाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे जंगली प्राणी जगण्यासाठी जिथे वाट मिळेल तिकडे फिरत आहेत. जोपर्यंत वरील गोष्टी थांबत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहणारच, असे मरवे यांनी स्पष्ट केले.


मोठ्या प्रमाणात जंगलतोड, जंगलाचा नाश, आधुनिक संस्कृती, रिसॉर्ट, फार्महाऊस, तथाकथित ‘जंगल हाऊस’, आधुनिक वृक्षारोपण, मानव वस्तीचा विस्तार — अशा अनेक कारणांमुळे जंगली प्राणी मानवी वसाहतीत शिरत आहेत. “यात त्या प्राण्यांची काय चूक आहे?” असा सवाल एका नेटकऱ्याने केला.


खानापूर तालुक्यातील शेतकरी या रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले असून जटगे भागातील शेतकरी अशा त्रासामुळे कर्जबाजारी होत आहेत. गेल्या 75 वर्षांत वनखात्याने अशी कोणतीही यशस्वी योजना राबवली नाही, ज्यामुळे शेतकरी व त्याचे पीक सुरक्षित राहील. या भागातील शेतकरी वर्षातून एकदाच भाताचे मुख्य पीक घेतो आणि त्याची आर्थिक व्यवस्था त्यावरच अवलंबून असते. “बेंगळुरूमध्ये बसून मंत्री व अधिकारी बडेजाव करतात. नींबरात एक दिवस काम करून बघा,” अशी तीव्र प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.


वनखात्याने आपल्या हद्दीतील जनावरे सांभाळावीत, कुंपणाची योग्य व्यवस्था करावी. मात्र शेतकऱ्यांना कवडीमोल नुकसानभरपाई देणाऱ्या वनखात्याची मुजोरी वाढली आहे. जंगल भागातील शेतकऱ्यांना जनावरांची पैदास वाढल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या जीवाची हमी कोण घेणार? असा सवाल एकाने उपस्थित केला.


आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे नाव घेत एका नेटकऱ्याने सांगितले की, जंगल भागातील विद्यार्थी पायपीट करून दुसऱ्या गावात शाळेला जातात. शेतकरी व शेतकरी महिला एकट्या शेतात काम करतात. त्यांच्या जीवित सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत. अन्यथा अस्वलाने हल्ला केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये धीर देण्यापेक्षा, तो प्रसंग होऊ नये, यासाठी पावले उचलावीत. तुम्ही आणि वनमंत्री यांनी याची दखल घेतली तरच तुम्ही यशस्वी लोकप्रतिनिधी आहात. पुढील उपाययोजनांची आम्ही वाट पाहत आहोत, असे मत खानापूर तालुक्यातील एका नागरिकाने व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.