बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात आयोजित कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने सर्व मर्यादा ओलांडल्या. सुमारे आठ तासांहून अधिक काळ डीजेचा कर्णकर्कश आवाज सुरू राहिल्याने केवळ मराठी भाषिकच नव्हे, तर खुद्द कन्नड भाषिक नागरिक आणि बेळगावकर हैराण झाले. या मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांना कन्नड संघटनांनी तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले.
आरटीओ येथील संगोळी रायण्णा चौकातून सकाळी सुरू झालेल्या चित्ररथांच्या या मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर अबालवृद्धांसह अनेकांनी सहभाग घेतला. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कन्नड संघटनांना प्लाझ्मा लाईट्स आणि मोठ्या आवाजाच्या डीजे सिस्टम न वापरण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांना केराची टोपली दाखवत नेहमीप्रमाणेच धुडगूस घालण्यात आला.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत मराठी भाषिकांच्या श्री गणेशोत्सव आणि श्री शिवजयंती मिरवणुकांमध्ये डीजेवर सक्तीने बंदी घातली जाते. तसेच ‘एक टॉप दोन बेस’ची सक्ती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह डीजे जप्त करण्याची कारवाई केली जाते. याउलट, राज्योत्सव मिरवणुकीत मात्र सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. या मनमानी डीजेच्या आवाजामुळे शहरातील रहिवाशांना, विशेषतः वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला.
मिरवणुकीचा केंद्रबिंदू असलेल्या राणी चन्नम्मा चौकातच जिल्हा रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. याठिकाणी केवळ १० मिनिटे चित्ररथ थांबवण्याचे निर्देश असतानाही, शुक्रवारी रात्रीपासून या संवेदनशील परिसरात डीजेचा दणदणाट सुरू होता. रुग्णांच्या आरोग्याची कोणतीही पर्वा न करता कन्नड संघटनांच्या चित्ररथांचा धिंगाणा सुरूच असल्याचे दिसून आले.
प्रशासनाकडून होत असलेल्या नियमांच्या दुहेरी अंमलबजावणीवर बेळगावकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ध्वनी प्रदूषणाचे कारण पुढे करत मराठी नागरिकांच्या कार्यक्रमांमध्ये डीजेवर निर्बंध लादले जातात, पण राज्योत्सवादरम्यान उघड उल्लंघन होऊनही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे, डीजेच्या या मनमानी दणदणाटावर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे धाडस दाखवले जाणार का, हा प्रश्न आता बेळगावकरांना सतावत आहे.





