बेळगाव लाईव्ह :दरवर्षी सरकारच्या हिवाळी अधिवेशनापुरते सदाशिवनगर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले जाते. यावेळी तसे न करता अधिवेशनानंतर संपूर्ण सदाशिवनगर येथील अंतर्गत खराब रस्त्यांचेही डांबरीकरण केले जावे अशी, जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सदाशिवनगर येथील येथील मुख्य रस्ता वगळता अंतर्गत जवळपास सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे.
पावसाळ्यात सर्वत्र पाण्याची डबकी आणि चिखलाने व्यापला जाणाऱ्या या रस्त्यावर उखडलेली खडी आणि धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. माजी आमदार फिरोज सेठ सत्तेवर असताना डांबरीकरण करण्यात आलेल्या या रस्त्यांकडे त्यानंतर साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाचखळगे पडले आहेत.
खराब रस्त्यांसंदर्भात वारंवार तक्रार करून देखील महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही. गेल्या श्री गणेश चतुर्थी वेळी खडी टाकून या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. कालांतराने ही खडी देखील आता रस्त्यावर पसरली आहे.
या पद्धतीने पसरलेली खडी आणि खड्ड्यांसह धुळीने माखलेले सदाशिवनगर येथील रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना कसरत करत आपली वाहने हाकावी लागत आहेत. तरी स्थानिक आमदारांसह महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. दरवर्षी सरकारच्या हिवाळी अधिवेशनावेळी सदाशिवनगर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले जाते.
तथापि अंतर्गत रस्त्यांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. तेंव्हा यावेळी तसे न करता अधिवेशनासाठी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर अधिवेशन उरकताच अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.




