बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डीसीसी नूतन अध्यक्षपदी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी आमदार राजू कागे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचेच होतील आणि ही दोन्ही पदे लिंगायत समाजाला देण्याचे आम्ही यापूर्वीच वचन दिले होते. त्या वचनाची आम्ही पूर्तता केली आहे, अशी माहिती आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी आज सोमवारी सकाळी डीसीसी बँकेच्या आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
आमदार जारकीहोळी यांनी सांगितले की, बेळगाव जिल्हा पालक मंत्र्यांच्या आदेशावरून त्यांच्याशी चर्चा करून, तसेच बँकेच्या सर्व संचालकांसोबत चर्चा करून यापूर्वी पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे बँकेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जोल्ले आणि उपाध्यक्षपदी कागवाडचे आमदार राजू कागे या दोघांचीच नामपत्रे दाखल झाल्यामुळे त्यांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज दुपारी तीन वाजता होणाऱ्या बँकेच्या बैठकीमध्ये केली जाणार आहे, तथापि त्यापूर्वीच प्रसिद्धी माध्यमांद्वारे जिल्ह्यातील सर्व जनता, शेतकरी, ग्राहक, कर्मचारी वगैरे सर्वांना विश्वास सांगू इच्छितो की आम्ही व जोल्ले यांनी मिळून बनवलेल्या पॅनलला बहुमत मिळाले आहे.
पुढे बोलताना जारकीहोळी म्हणाले की, नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांना अर्थतज्ज्ञ म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली येत्या पाच वर्षांत डीसीसी बँकेची आणखी भरभराट होईल, असा आम्हाला विश्वास आहे. बँकेला असा अध्यक्ष मिळणे हे आम्हा सर्वांचे आणि शेतकऱ्यांचे भाग्य म्हणावे लागेल. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक, नोकर आणि ठेवीदारकांना आवाहन केले की समाज माध्यमांवर डीसीसी बँकेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. बँकेतील हजारो कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या असल्याची अफवा पसरवली जात आहे, त्यावर त्यांनी विश्वास ठेवू नये. कारण डीसीसी बँकेमध्ये दरवर्षी या कालावधीत सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या जातात आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत त्या ठेवी पुन्हा बँकेत जमा होत असतात. यावेळी सोन्याचा दर वाढल्यामुळे सुमारे दोनशे कोटी इतक्या जास्त ठेवी काढून घेतल्या गेल्या आहेत. याचा गैरफायदा घेऊन जारकीहोळी बँक लुटत आहेत असा अपप्रचार केला जात आहे.
एकंदर शेतकरी, ग्राहक आणि ठेवीदारांनी या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. उद्यापासून डीसीसी बँक आमचे अर्थतज्ज्ञ अण्णासाहेब जोल्ले यांच्या ताब्यात असणार असल्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहावे. येत्या पाच वर्षांत बँकेच्या ठेवी दहा हजार कोटीपर्यंत नेऊन ते बँकेची भरभराट करतील असा विश्वास व्यक्त करून बँक उत्तम प्रकारे चालवून जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक आणि ठेवीदारांचे भले करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी शेवटी स्पष्ट केले.याप्रसंगी बँकेचे नूतन अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, उपाध्यक्ष आमदार राजू कागे, माजी आमदार अरविंद पाटील आदी उपस्थित होते.




