बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विकास संघटनेच्या वतीने कन्नड भवन येथे आयोजित विद्यार्थी प्रतिभा पुरस्कार आणि कन्नड राज्योत्सव कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक वाय. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत खळबळजनक दावा केला.
“छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध कन्नड वंशाचे आणि लिंगायत होते. त्यांचे कुलदैवत श्रीशैल मल्लिकार्जुन होते,” असे पाटील यांनी व्यासपीठावर बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले. आमदार आसिफ सेठ, भीमराव पवार, हुबळीचे पोलिस निरीक्षक डॉ. ज्योतिर्लिंग होनकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष नेत्रेकर यांनी भूषविले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, “कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये बेळगावात प्राचीनकाळापासून बंधुत्वाचे नाते आहे. कन्नड ही इतर सर्व भाषांना मागे टाकणारी समृद्ध भाषा आहे. ब्रिटिश काळातही कन्नडला विशेष महत्त्व होते.”
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कर्नाटकातील नेत्यांकडून याआधीही वादग्रस्त दावे करण्यात आले असून, आता साहित्यिक पाटील यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे चर्चा अधिक चांगलीच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


