बेळगाव लाईव्ह : कोणत्याही महानगरपालिकेचे प्रमुख ध्येय म्हणजे स्थानिक नागरिकांना उत्तम सेवा देणे. त्याचप्रमाणे, आम्हीदेखील बेळगाव महापालिकेत नागरिक-केंद्रित प्रशासन देण्याच्या दृष्टीने काम करू. महापालिकेकडून मिळणाऱ्या सर्व सुविधांमध्ये जनतेला प्रामाणिक सेवा पोहोचवू, असे बेळगाव महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर कार्तिक एम यांनी सांगितले.
सरकारच्या आदेशानुसार शुक्रवारी (28/11/2025) बेळगाव महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले की, नागरिकांना उत्तम सुविधा देण्याबरोबरच स्वच्छ बेळगाव शहर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आमचा हेतू आहे. महापालिकेतील सर्व सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
यासाठी जागरूकता निर्माण करून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये प्रामाणिक कार्य करू, असेही त्यांनी सांगितले.
लोकांना अधिक जवळचे प्रशासन देण्याच्या दृष्टीने काम करताना, महापालिकेच्या सर्व विभागांतील सध्याची परिस्थिती जाणून घेत उत्तम कृती आराखडा तयार करून त्याची योग्य अंमलबजावणी करण्याच्या मार्गाने आम्ही काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणतेही सरकार किंवा प्रशासन असले तरी अधिकाऱ्यांच्या कामात फरक पडत नाही. आम्ही विभागाच्या नियमांनुसारच काम करतो. निस्वार्थ सेवा व तटस्थपणे काम करण्यावर आमचा भर असेल, असे त्यांनी सांगितले. चित्रदुर्ग आणि गुलबर्गा येथे काम केल्यानंतर बेळगाव हा त्यांचा पहिलाच कार्यकाळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आता मला एक जबाबदारी दिली आहे तर ती पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जबाबदारीने सहभागी होऊन, सरकारच्या आदेशानुसार उत्तम प्रकारे काम करू,” असेही त्यांनी सांगितले.


