बेळगाव लाईव्ह : कित्तूर राणी चन्नम्मा लघु प्राणिसंग्रहालयात काळविटांच्या सलग मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
याप्रकरणी प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगस्वामी यांनी आज प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यांनी काळवीट असलेल्या विभागाची पाहणी करून प्राणिसंग्रहालय अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा केली. पाहणीनंतर बोलताना त्यांनी ‘या घटनेला बॅक्टेरिया (जीवाणू) कारणीभूत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, निश्चित कारण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अहवाल येणे आवश्यक आहे. वनमंत्र्यांची भेट घेऊन पुढील उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. यापुढे राज्यातील कोणत्याही प्राणिसंग्रहालयात अशी घटना होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाईल,’ असे त्यांनी म्हटले. ‘या रोगावर कोणते औषध दिले आहे याची कल्पना नाही. इतर प्राणिसंग्रहालयात हा रोग आल्यावर कोणता उपचार केला होता, याची माहिती घेऊन उपचार सुरू करावे लागतील. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, चित्र स्पष्ट झाल्यावर या प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
सीसीएफ मंजुनाथ यांनी काळविटांच्या मृत्यूसंदर्भात येथील अधिकाऱ्यांनी म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले असल्याचे स्पष्ट केले. उपचार करून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्राण्यांतील संसर्गजन्य रोग हेच मृत्यूचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. ‘चाऱ्यातून संसर्ग झाल्याचा आरोप वस्तुस्थितीपासून दूर आहे. प्राण्यांमध्ये रोग येणे स्वाभाविक आहे, याला कोणीही जबाबदार नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

काळविटांच्या सलग मृत्यू मालिकेमध्येही प्राणिसंग्रहालयात उर्वरित ७ काळवीट पूर्णपणे सक्रिय असून, ते विभागात फिरताना दिसत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित प्राण्यांना कोणत्याही परिस्थितीत रोग पसरू नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी काळविटांचा विभाग पूर्णपणे झाकून टाकला असून, आवश्यक ती खबरदारी घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


