बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील 31 काळवीटांचा एकापाठोपाठ एक झालेला मृत्यू विषाणूजन्य संसर्गामुळे झाला असल्याचे निदर्शनास आले असून यासाठी प्राणी संग्रहालयाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
भूतरामहट्टीच्या राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील तब्बल 31 काळवीटांच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्राणी संग्रहालयातील काळवीट गेल्या 13 नोव्हेंबरपासून एकापाठोपाठ एक मृत्युमुखी पडत आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करून तज्ञ पशुवैद्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार हे मृत्यू ‘हेमोरेजीक सेप्टीसेमिया’ या विषाणूजन्य संसर्गामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सदर आजार संसर्गजन्य असून इतर शाकाहारी प्राण्यांनाही याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा आजार रोखण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावच्या उपवन संरक्षणाधिकार्यांनी जिल्हा पशु संगोपन व पशुवैद्यकीय सेवा खात्याच्या उपसंचालकांना केली आहे.
त्यानुसार प्राणी संग्रहालयाच्या आसपास असणाऱ्या गावातील पशुपालकांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात येत आहे.




