बेळगाव: बेळगाव शहरासह आसपासच्या तालुक्यांत व्यापारी आस्थापनांच्या फलकांवरील मराठी व इंग्रजी भाषेचा मजकूर पुसणे, रंगफास करणे व फलक हटविण्याच्या बेकायदेशीर कृती तात्काळ थांबविण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे सोमवारी केली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आर एम चौगुले, रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होती.
गेल्या काही महिन्यांपासून काही कथित कन्नडवादी संघटनांचे कार्यकर्ते व्यापारी फलकांवर बेकायदेशीर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप समितीने यावेळी केला. शहरातील दुकाने, शैक्षणिक संस्था, बँका, उद्योग आदी सर्व आस्थापने कायदेशीर परवानग्या घेऊन व्यवसाय चालवत असून मराठी व इंग्रजी भाषा फलकांवर वापरण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
भारतीय संविधानातील कलम 19(ग) नुसार व्यापार व व्यवसाय करण्याचा मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना आहे. तसेच मराठी भाषा संविधानातील अनुसूची – 8 मध्ये मान्यताप्राप्त आहे आणि इंग्रजी भाषा प्रशासकीय वापरासाठी वैध आहे. त्यामुळे व्यावसायिक फलकांवर मराठी व इंग्रजी वापरण्यास कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

कन्नड भाषा सर्वांगीण विकास कायदा 2022 हा मुख्यत्वे सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फलकांसाठी लागू असून, खाजगी व्यापारी आस्थापनांवर मराठी किंवा इंग्रजी वापरण्यास बंदी घालणारा कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बेकायदेशीररीत्या फलकांचे नुकसान करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे नोंद करून कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर चौकटीत राहून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी समितीने दिला.




