बेळगाव लाईव्ह :कर्नाटक शासनाने जाहीर केलेल्या अनुदान, कर्ज योजना आणि शिष्यवृत्तींसंदर्भात जिल्हा अल्पसंख्याक प्राधिकरण आणि कर्नाटक अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने ख्रिश्चन बांधवांसाठी आयोजित जागृती कार्यक्रम काल रविवारी सायंकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
कॅम्प, बेळगाव येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या सभागृहात आयोजित सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव जमले होते. त्यामध्ये विविध पंथांतील अंदाजे 500 ख्रिश्चन बांधव, पाद्री आणि पाद्रीवर्ग यांचा समावेश होता. या सर्वांनी कर्नाटक ख्रिश्चन समुदाय विकास महामंडळाने (केसीसीडीसी) सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी या योजनांच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा अल्पसंख्याक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार लुईस रॉड्रिग्ज यांनी या कार्यक्रमाचे संक्षिप्त वर्णन केले. त्यांनी ख्रिश्चन बांधवांना शासकीय योजना व शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी बोलताना केसीसीडीसीचे संचालक प्रशांत जत्थन्ना यांनी विविध योजनांची माहिती दिली. “जिल्ह्यात सर्वात मोठा असलेला बेळगाव जिल्हा या योजनांचा लाभ घेण्यात मागे आहे. संपूर्ण जिल्ह्यातून केवळ सहा अर्ज प्राप्त झाले आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे. सर्व ख्रिश्चन बांधवांनी या योजनांचा शेवटच्या तारखेपूर्वी लाभ घ्यावा,” असे त्यांनी सांगितले. तसेच या योजनांची अंतिम तारीख 15 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहितीही दिली.
कर्नाटक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अकबरसाब कुर्तकोटी यांनी महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि छोट्या व्यावसायिकांसाठी उपलब्ध व्यावसायिक कर्ज आणि अनुदान योजनांची पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच अल्पसंख्याक कल्याण विभागातील मंजूनाथ यांनी शिष्यवृत्ती आणि अन्य आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
सदर कार्यक्रमांतर्गत आरिवू, परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कौशल्य अभिवृद्धी, श्रमशक्ती, गंगा कल्याण, स्वयं-सहायता गट यांसह विविध योजनांची माहिती देण्यात आली. बेळगाव चर्चचे रेव्ह. नूरुद्दीन मुल्ला आणि बेळगावचे बिशप सचिव फा. प्रमोद कुमार यांनी प्रार्थना केली. फा. जेराल्ड ड’सिल्वा, फा. सिरील ब्रॅग्ज, रेव्ह. थॉमस, रेव्ह. अंकलगी तसेच बेळगाव शहरातील आणि लोणदा, खानापूर, गोकाक, बेळगाव ग्रामीण, रायबागसह विविध ठिकाणांहून ख्रिश्चन बांधव याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान सरकारी योजनांबद्दल ख्रिश्चन बांधवांनी
जिल्हा अल्पसंख्याक कार्यालय, कणबर्गी रोड, बेळगाव येथे संपर्क साधावा. (कार्यालय संपर्क: +91 8277944206. अर्ज केंद्र : शनिवारी खूट येथील इंटरनेट केंद्र. कर्नाटक ख्रिश्चन समुदाय विकास निगम. संपर्क: +91 8277944206, जिल्हा व्यवस्थापक: 9035073747,
अकबरसाब कुर्तकोटी (वैयक्तिक): 9448564889 अथवा लुईस रॉड्रिग्ज: 8618643958.). तसेच अधिक माहिती व ऑनलाइन अर्जासाठी : https://kccdclonline.karnataka.gov.in/Portal/ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




