बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन वर्षांपासून अतवाड गावाला अपुरी बस सुविधा पुरविण्यात येत असल्यामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याच कारणामुळे नागरिकांना शहरात येण्यासाठी देखील पुरेशी बस सुविधा उपलब्ध नाही, ज्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
संतप्त झालेल्या अतवाड ग्रामस्थांनी परिवहन विभागावर मोर्चा काढला आणि रास्ता रोको केला. यावेळी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या संदर्भात जाब विचारला असता, अतवाड गावात शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे गावाला बस सुविधा पुरविण्यात येत नसल्याचे विचित्र उत्तर देण्यात आले. गावात बस वेळेवर येत नाही, तसेच वेळापत्रक निश्चित नसल्यामुळे ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
बस कर्मचाऱ्यांकडून गावात पाण्याची आणि शौचालयाची सुविधा नसल्याचे कारण दिले जात आहे, परंतु ग्रामस्थांकडून या सर्व सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने देखील शौचालयाच्या व्यवस्थेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, तरीही परिवहन विभागाकडून केवळ कारणे देण्याचे काम सुरू आहे. ही समस्या त्वरित सोडवण्यात आली नाही, तर उद्या उचगावचा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने व्यंकटेश हेब्बाळकर यांनी दिला.
या आंदोलनात सहभागी झालेल्या बेकिनकेरे येथील विद्यार्थिनीने सांगितले की, गावात बस सुविधा योग्यरित्या नसल्यामुळे शाळा-महाविद्यालयांना जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बस वेळेवर येत नसल्यामुळे शाळेला-महाविद्यालयाला जाताना आणि महाविद्यालयातून पुन्हा घरी परतताना देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तातडीने ही समस्या दूर करण्याची मागणी या विद्यार्थिनीने केली.
अपुऱ्या बससेवेबद्दल अनेकदा परिवहन विभागाला निवेदने सादर करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आजच्या मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी बस अडवून रास्ता रोको केला. यावेळी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे आंदोलनकर्ते आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. ही समस्या त्वरित सोडवण्यात आली नाही, तर उद्या उचगावचा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.



