बेळगाव लाईव्ह : अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्या विरुद्ध आर्थिक व्यवहार मिटवण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल झाला आहे. तसेच लोकायुक्त पोलिसांनी अथणी पोलीस ठाण्यावर धाड टाकून चौकशीला सुरुवात केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
रियल इस्टेट व्यावसायिक मीरासाब मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा एफआय आर दाखल केला गेला आहे. लोकायुक्त पोलीस प्रमुख हनुमंतराय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून काल बुधवारी लोकायुक्त पोलीस उपाधीक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त पोलीस पथकाने अथणीला भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भूखंड खरेदीच्या 20 लाख रुपयांच्या व्यवहारातून मिरासाब यांना प्रयत्नांती 15 लाख मिळाले होते. त्यामुळे उर्वरित 5 लाख रुपयांसाठी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधितांना बोलावून समज देऊन उर्वरित व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याच्या बदल्यात 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
या संबंधीचा पुरावा असणारा ऑडिओ मीरासाब यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अथणी पोलीस ठाण्यावर धाड टाकून चौकशीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे एका वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.


