बेळगाव लाईव्ह : देशसेवेचे स्वप्न मनात बाळगून सैन्यात भरती होण्यासाठी देशाच्या विविध राज्यांतून बेळगावात दाखल झालेल्या युवकांसाठी बेळगावातील प्रतिष्ठित उद्योजक शिरीष बाळकृष्ण गोगटे यांनी पुढाकार घेत पाणी आणि बिस्कीटांचे वितरण करत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली.
नवीन पिढी सैन्यात भरती होत असताना त्यांच्या मनात ज्वलंत देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित असते. या उमेदवारांच्या त्याग, जिद्द आणि स्वप्नांचा सन्मान म्हणून समाज कसा पुढे येऊ शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शिरीष गोगटे यांचे हे कार्य होय.
गेल्या आठवड्यापासून बेळगावात सुरू असलेल्या टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन भरती प्रक्रियेसाठी भारतभरातील युवक मोठ्या संख्येने आले आहेत. शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि संघटना या युवकांना अल्पोपहार, निवारा आणि आवश्यक मदत देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यातच सोमवार रात्री उद्योजक शिरीष गोगटे यांनी हजर राहून 700 हून अधिक उमेदवारांना पाण्याच्या बाटल्या व बिस्कीट वाटप केले.

रेल्वे स्टेशन, CPED ग्राऊंड आणि शौर्य सर्कल परिसरात भरतीसाठी आलेले अनेक युवक उघड्यावर विश्रांती घेताना दिसत आहेत. त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवत गोगटे यांनी त्यांना मानसिक आधार देण्याचा आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करण्याचा प्रयत्न केला.
युवकांनी आणि उपस्थित नागरिकांनी गोगटे यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. देशसेवेने प्रेरित झालेल्या या तरुणांची साथ समाजाने दिली पाहिजे, असा संदेश या माध्यमातून दृढपणे देण्यात आला.
देशासाठी झटणाऱ्या युवकांचा सन्मान आणि पाठबळ देणे हीच खरी देशभक्ती अशी भावना उद्योजक शिरीष गोगटे यांनी यावेळी व्यक्त केली.



